बल्‍लारपूर विधानसभा मतदार संघ देशातील पहिला आरो युक्‍त मतदार संघ ठरावा – सुधीर मुनगंटीवार आगरझरी आणि पदमापूर येथे आकर्षक प्रवासी बस निवा-यांचे लोकार्पण Featured

Monday, 07 January 2019 06:38 Written by  Published in चंद्रपूर Read 38 times

बल्‍लारपूर विधानसभा मतदार संघ हा महाराष्‍ट्रातीलच नव्‍हे तर देशातील पहिला आरो युक्‍त मतदार संघ ठरेल यादृष्‍टीने आपण प्रयत्‍नशील आहोत. हा मतदार संघ शंभर टक्‍के एलपीजी गॅसयुक्‍त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धूरमुक्‍त गावांचे स्‍वप्‍न आपल्‍याला साकार करायचे आहे. या मतदार संघातील 125 गावांमध्‍ये आकर्षक असे प्रवासी निवारे बांधण्‍याचा संकल्‍प आपण केला असून पदमापूर आणि आगरझरी या गावांमध्‍ये पहिला प्रयोग आपण राबविला आहे. या मतदार संघातील सर्व अंगणवाडया आय.एस.ओ. मानांकित करून त्‍या माध्‍यमातुन 0 ते 6 वयोगटातील बालकांना योग्‍य शिक्षण व संस्‍कार देण्‍याचा आपला मानस आहे, असे प्रतिपादन अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नागरिकांच्‍या मागणीच्‍या अनुषंगाने आगरझरी येथे 10 लक्ष रू. निधी खर्चुन आमदार निधीतुन सामाजिक सभागृह बांधण्‍याची घोषणा त्‍यांनी यावेळी केली.

दिनांक 6 जानेवारी रोजी चंद्रपूर तालुक्‍यातील पदमापूर आणि आगरझरी या गावांमध्‍ये प्रवासी निवा-यांचे उदघाटन त्‍यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी भाजपा नेते रामपाल सिंह, जिल्‍हा परिषदेचे समाजकल्‍याण विभागाचे सभापती ब्रिजभूषण पाझारे, मनपा चे स्‍थायी समिती सभापती राहूल पावडे, जिल्‍हा परिषद सदस्‍या रोशनी खान, चंद्रपूर तालुका भाजपाचे अध्‍यक्ष हनुमान काकडे, फारूक शेख, जयंत टापरे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, चंद्रपूर तालुक्‍यातील 50 गावांमध्‍ये आरो मशीन बसवून त्‍या माध्‍यमातुन शुध्‍द पाणी पुरवठा करण्‍यात येत आहे. हा प्रयोग आता संपूर्ण मतदार संघात राबवत हा मतदार संघ देशातील पहिला आरो युक्‍त मतदार संघ ठरेल, असा आपला प्रयत्‍न आहे. प्रत्‍येक घरात एलपीजी गॅस उपलब्‍ध व्‍हावा व त्‍या माध्‍यमातुन हा मतदार संघ धूरमुक्‍त ठरावा हा आपला संकल्‍प आहे. सर्व अंगणवाडया आय.एस.ओ. मानांकित करून त्‍या माध्‍यमातुन बालकांना सुसंस्‍कारीत करण्‍याचा आपला मानस आहे, असेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले. पदमापूर आणि आगरझरी या दोन गावांमध्‍ये आमदार निधीतुन बांधण्‍यात आलेल्‍या प्रवासी निवा-यांचे लोकार्पण यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.