जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील पदभरती घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष शेखर धोटे , यांच्यासह एकूण ११ जणांवर एसीबीने दाखल केले गुन्हे. बँकिंग क्षेत्रात खळबळ

Tuesday, 08 August 2017 14:09 Written by  Published in चंद्रपूर Read 966 times

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २०१३ साली झालेल्या पदभरती घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष शेखर धोटे , विद्यमान संचालक, तत्कालीन बँक सीईओ ,  एमकेसीएल कर्मचारी अशा एकूण ११ जणांवर एसीबीने रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे . १८ नियुक्त उमेदवारांचे गुण आर्थिक व्यवहारानंतर वाढविल्याचा आरोप आहे, या कारवाई नंतर बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात सर्वात मोठे  प्रस्थ असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील पदभरती घोटाळ्यातील गैरव्यवहाराची कुजबुज अखेर गुन्हे रूपात पुढे आली आहे. २०१३ साली झालेल्या पदभरती घोटाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वतःहून कारवाई करत तत्कालीन अध्यक्ष शेखर धोटे , ५ संचालक, बँक सीईओ, सरकारी अधिकारी  आणि एमकेसीएल कंपनीच्या कर्मचा-यांसह एकूण ११ जणांवर थेट गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईने बँकिंग वर्तुळ हादरले आहे. 

  चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०१३ साली झालेल्या शिपाई आणि कारकून पदभरती दरम्यान मोठ्या प्रमाणावर अपात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात आल्याच्या तक्रारी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. यातील पात्र उमेदवारांवर यामुळे मोठा अन्याय झाला होता. या तक्रारींची दखल घेत  एसीबीने प्राथमिक चौकशीनंतर २०१३ साली बँकेचे अध्यक्ष असलेल्या व विद्यमान संचालक असलेल्या शेखर धोटे  यांच्यासह ११ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. शेखर धोटे जिल्ह्यातील काँग्रेसी घराणे असलेल्या धोटे परिवारातील  सदस्य असून माजी आमदार ज्येष्ठ काँग्रेस नेते सुभाष धोटे यांचे बंधू आहेत. शेखर धोटे यांच्यासह सध्या संचालक असलेल्या नंदा अल्लुरवार , प्रभाताई वासाडे , ललित मोटघरे , रविंद्र  शिंदे, पांडुरंग जाधव ,  बँकेचे तत्कालीन सीईओ विजय खेडीकर ,  निवड समिती सदस्य लक्ष्मीकांत पाटील, अशोक वाहणे , मदन अहिरे , एमकेसीएल पुणे चे गिरीधर अभंग अशा एकूण ११ जणांवर एसीबीने  गुन्हे दाखल केले आहेत. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील पदे भरण्यासाठी बँकेने एमकेसीएलसोबत करार करत भरती प्रक्रिया राबविली होती. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या ११ आरोपींनी पात्र उमेदवारांना डावलून अपात्र उमेदवारांकडून आर्थिक देवाण-घेवाण करत नियुक्तीपत्रे दिली असा आरोप  ठेवण्यात आला आहे. यातील १८ उमेदवारांना  प्रत्येकी ८गुण वाढवून देण्यात आले व त्यांना पात्र ठरवत नियुक्तीपत्रे देण्यात आली. या भरतीत अन्याय झालेल्या उमेदवारांनी यासंदर्भात एसीबीला तक्रारी केल्या त्यानुसार चौकशी पूर्ण करून आज एसीबीने स्वतःहुन फिर्याद देत कारवाई पूर्ण केली. या घोटाळ्यात लाभ पोचलेल्या उमेदवारांना आरोपी  करण्यात येणार असून त्यानुसार तपास केला जात आहे.  

 

Super User

चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.